पुरंदर रिपोर्टर Live | लोणंद प्रतिनिधी :
आळंदी–पंढरपूर महामार्गावरील लोणंद येथील नव्या बायपास पुलाजवळ काल (दि. २०) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लोणंद येथील प्रगतशील बागायतदार रामचंद्र शंकरराव शेळके (वय ६७) गंभीर जखमी झाले होते.
अपघातानंतर त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने लोणंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामचंद्र शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व भाऊ असा परिवार आहे. लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक भरत शेळके हे त्यांचे धाकटे बंधू होत. तसेच त्यांचे वडील कै. शंकरराव शेळके यांनी लोणंद ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम पाहिले होते.
शेळके कुटुंब लोणंद पंचक्रोशीत सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, प्रगतशील शेती आणि बागायती क्षेत्रातील प्रतिष्ठित कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे. रामचंद्र शेळके यांच्या आकस्मिक निधनाने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
रामचंद्र शेळके यांच्यावर आज (दि. २१) सकाळी ११ वाजता लोणंद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

0 Comments